Mother Teresa Information In Marathi (मदर टेरेस यांच्याविषयी संपूर्ण माहिती)

Mother Teresa Information In Marathi in Language

Mother Teresa Information In Marathi: जगात प्रत्येक जण हा स्वतःसाठी जगतो, परंतु इतिहासात अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांसाठी कार्य केले,अशा लोकांचे संपूर्ण आयुष्य प्रेरणादायक असते आणि मरणानंतरही लोक त्यांचे मनापासून स्मरण करतात मदर टेरेसा देखील अशा महान व्यक्तींपैकीं एक आहेत. मदर टेरेसा असे नाव आहे की जेव्हा आपण ते आठवतो तेव्हा आपले हृदय श्रद्धेने भरून जाते. मदर टेरेसा एक महान व्यक्ती होत्या त्यांचे हृदय जगातील सर्व गरीब, असहाय्य आजारी आणि जीवनामध्ये एकटे असणाऱ्या लोकांसाठी नेहमी धडधडत असे आणि म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेसाठी वाहिले.

मदर टेरेसा या भारताच्या नव्हत्या परंतु जेव्हा त्या पहिल्यांदा भारतात आल्या तेव्हा त्या इथल्या लोकांच्या प्रेमात पडल्या आणि आपले संपूर्ण आयुष्य भारतात व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी भारतासाठी अभूतपूर्व कार्य केली आहेत.

मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला. त्यांचे खरे नाव अगनेस गोंझा बोयाजिजू (Agnes Gonxha Bojazhiu) असे होते. त्यांचे वडील एक सामान्य व्यावसायिक होते. ते धार्मिक होते तसेच ते नेहमी त्यांच्या घराजवळच्या चर्चमध्ये जात असत आणि ते येशूचे अनुयायी होते. १९१९ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर मदर टेरेसा यांना त्यांच्या आईने मोठे केले.वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराची परिस्तिथी अत्यंत हलाखीची झाली.

पाच भावंडांपैकी त्या सर्वात लहान होत्या त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची मोठी बहीण सात वर्षाची तर भाऊ दोन वर्षाचा होता आणि इतर दोन भावंडांचे बालपणातच निधन झाले. मदर टेरेसा सुंदर, अभ्यासू तसेच मेहनती होत्या. अभ्यासासोबतच त्यांना गाण्याची ही फार आवड होती. त्या आपल्या आई आणि बहिणी सोबत चर्चमध्ये येशूचे गौरव गीत गात असे.

असे मानले जाते की मदर टेरेसा जेव्हा बारा वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांना समजले होते की आपण आपले संपूर्ण आयुष्य मनुष्य सेवेत घालवायचे आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी 'सिस्टर्स ऑफ लोरेटो' मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आयलँड मध्ये जाऊन त्या इंग्रजी शिकल्या, इंग्रजी शिकणे आवश्यक होते कारण लोरेटो मधील सिस्टर याच माध्यमातून भारतामध्ये मुलांना शिकवत असत.

मदर टेरेसा यांचे भारतात आगमन:

मदर टेरेसा आयलँडहून ६ जानेवारी १९२९ रोजी कोलकत्ता मधील लोरेटो कॉन्व्हेंटमध्ये पोहोचल्या. त्या एक शिस्तबद्ध शिक्षिका होत्या आणि तसेच विद्यार्थ्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. मदर टेरेसा १९४४ मध्ये मुख्याध्यापिका बनल्या. त्यांचे मन शिक्षणामध्ये पूर्णपणे गुंतलेले होते परंतु आस-पासची गरीबी, दारिद्र्य आणि लाचारी यामुळे त्या नेहमी अस्वस्थ असायचा. परंतु एक काळ असा आला जेव्हा दुष्काळामुळे कोलकत्ता या शहरात फार मोठ्या प्रमाणात मृत्यू होत होते आणि गरीबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. ही सर्व परिस्थिती पाहता मदर टेरेसा यांनी या गरीब आजारी आणि गरजवंत लोकांची सेवा करण्याचा निश्चय केला.

मिशनरी ऑफ चॅरीटी' ची स्थापना:

१९४६ मध्ये मदर टेरेसा यांनी गरीब, असहाय्य आणि आजारी लोकांना आयुष्यभर मदत करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी पटना येथील एका होली फॅमिली हॉस्पिटल मधून नर्सिंगचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या कोलकात्यामध्ये पुन्हा आल्या आणि गरीब वृद्धांची काळजी घेणाऱ्या एका संस्थेमध्ये राहू लागल्या. त्यांनी रुग्णांच्या जखमा धुतल्या, मलमपट्टी केली तसेच त्यांना औषधेही दिली.

पुढे हळूहळू त्यांनी आपल्या कामाद्वारे लोकांचे लक्ष वेधले, या लोकांमध्ये देशाचे उच्च अधिकारी तसेच भारताचे पंतप्रधान होते त्यांनी मदर तेरेसा यांच्या कार्याचे कौतुक केले.

मदर टेरेसा यांनी असे सांगितले आहे की, सुरुवातीचा काळ हा खूप कठीण होता त्यांनी लोरेटो सोडले होते त्यामुळे त्यांच्यापाशी कोणतेही उत्पन्नाचे साधन नव्हते. पोट भरण्यासाठी ही त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. जीवनाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्यांचे मन खूप अस्वस्थ होते, त्यांना खूप एकटेपणा जाणवत होता आणि मनामध्ये असाही विचार यायचा की लोरेटो च्या सुख सुविधांमध्ये परत जावे परंतु त्यांनी हार मानली नाही.

७ ऑक्टोंबर १९५० मध्ये त्यांना वैटीकन कडून 'मिशनरी ऑफ चॅरीटी' ची स्थापना करण्याची परवानगी मिळाली. या संघटनेचा मुख्य उद्देश भूक, नग्न, बेघर, पांगळे आंधळे, त्वचेचे आजार आणि समाजाचे स्थान नसलेल्या लोकांना मदत करणे हा होता.

या संस्थेची सुरुवात केवळ १३ लोकांनी मिळून केली होती परंतु मदर टेरेसा यांच्या मृत्यू च्या वेळी चार हजार पेक्षा जास्त सिस्टर जगभरात असहाय्य, निराधार, अंध, गरीब, बेघर, मद्यधुंद आणि एड्सच्या रुग्णांची सेवा करीत होत्या.

मदर टेरेसा यांनी 'निर्मल हृदय' आणि 'निर्मला शिशु भवन' या नावाने आश्रम उघडले. 'निर्मल हृदय' चे ध्येय असह्य, आजारांनी ग्रस्त रुग्ण आणि गरीब लोकांची सेवा करणे,ज्यांना समाजाने समाजापासून वेगळे केले आहे. तसेच 'निर्मला शिशू भवन' ची स्थापना अनाथ आणि बेघर मुलांना मदत मिळावी त्यासाठी केली.

अपार मेहनत आणि जिद्द ठेवून केलेले काम कधीच अपयशी ठरत नाही ही मदर टेरेसांच्या बाबतीत खरी ठरते. मदर टेरेसा भारतात आला तेव्हा त्यांनी निराधार आणि अपंग मुले तसेच असहाय्य रुग्णांची दयनीय अवस्था आपल्या डोळ्यांनी पहिली.या सर्व गोष्टींमुळे त्यांचे मन हेलावून गेले,आणि या लोकांपासून पाठ फिरवून जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही त्यानंतर त्यांनी लोकसेवेचा व्रत घेतला आणि त्याचे नेहमी पालन केले.

सन्मान आणि पुरस्कार:

मदर टेरेसा यांना मानवतेच्या सेवेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवर पुरस्कार मिळाले आहेत भारत सरकारने त्यांना पहिला 'पद्मश्री'(१९६२) आणि नंतर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न'(१९८०) देऊन त्यांचा गौरव केला.

१९८५ मध्ये अमेरिकेने त्यांना 'मेडल ऑफ फ्रीडम' देऊन नावाजले. मदर टेरेसा यांना मानवी कल्याणासाठी केलेल्या कामामुळे १९७९ मध्ये नोबेल शांती पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार त्यांना गरीब आणि असहाय्य लोकांना मदत केल्याबद्दल देण्यात आला. मदर टेरेसा यांनी नोबेल पुरस्कार ची १९२,००० डॉलर रक्कम गरिबांसाठी फंड म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला.

मदर टेरेसा यांचा मृत्यू:

वाढत्या वयानुसार मदर टेरेसा यांची तब्येतही बिघडत गेली. १९८३ मध्ये ७३ व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला.

त्या वेळी मदर टेरेसा रोम मध्ये पॉप जॉन पॉल द्वितीय यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.त्यानंतर १९८९ मध्ये त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि तेव्हा त्यांना कृत्रिम पेसमेकर बसवण्यात आला.वर्ष १९९१ मध्ये मेक्सिकोमध्ये निमोनिया झाल्यानंतर त्यांच्या हृदयाची समस्या वाढत गेली.

त्यानंतर त्यांची तब्येत ढासळत राहिली.१३ मार्च १९९७ रोजी त्यांनी मिशनरीज ऑफ चारिटी चे प्रमुख पद त्यांनी सोडले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूच्या वेळी मिशनरीज ऑफ चारिटी मध्ये ४००० सिस्टर्स आणि इतर ३०० सहयोगी काम करीत होते आणि ही संस्था जगातील १२३ देशांमध्ये समाजसेवेचे कार्य करीत होती.

मनुष्यसेवा आणि गरिबांची काळजी घेणाऱ्या मदर टेरेसा यांना पॉप जॉन पॉल द्वितीय यांनी १९ ऑक्टोंबर २००३ मध्ये रोममध्ये 'धन्य' असे घोषित केले.

Read More
Categories